दृश्य-अदृश्य
एखादा आसमंताचा तुकडा, एकांडे अनवट शिल्प, झाडे, पाने, पाणी यांची मूक गाणी किंवा आभाळाचे, धरतीशी जुळलेले गुपित.
कुठल्यातरी खोल कप्प्याला स्पर्श करून जाणारी ही चित्रे, दृश्य-अदृश्याच्या सीमारेषेवर रेंगाळणारी, पार्थीव आणि अपार्थिव, एकाच वेळी !
ऋषिकेशला गंगेच्या धावत्या प्रवाहामध्ये
तितक्याच हिरीरिने झोकून देणारी पणती.. जणू काही जळामधून ज्योत उगवावी तशी, द्रोण, फुले सगळे समर्पण करून झाल्यावरही गंगाजलाची
साथ न सोडणारी , हिमतीची..
प्रयागराजला गंगेच्या किनाऱ्यावरून १५-२०
किलोमीटर पासून पायी चालत निघालेले लहान-थोर , बायका, पुरुष, गाठोडी, पिशव्या सांभाळत, भाजत्या उन्हात, कहर गर्दी मध्ये पण त्या अमृतजल संगमस्नानासाठी पायपीट करत जाणारे.
कुठली दुर्दम्य श्रद्धा खेचून आणत असेल ह्या वरकरणी साध्यासुध्या पण व्रतनिष्ठ
भारतीय समाजाला, आपल्या घरातून, कुटुंबासह, आनंदाने आणि कर्तव्यबुद्धीने या पंचमहाभूत
दर्शनासाठी ?
जोतिबाच्या देवस्थानाबाहेर एका चौथऱ्याच्या
कडेला कोरलेले हे शिल्प, मानवी हातांची साखळी , गोलाकार , अनादी अनंत .. कुणी कोरले आणि का?
छत्तीसगड मध्ये जाणवलेले माणूस आणि निसर्गाचे
एकजीव अस्तित्व, छोटी छोटी बिलोरी तळी , भोवती डेरेदार वृक्ष नाहीतर झाडोरा, सावलीला बसलेली गुरे, लागूनच देवळे, चौथरे ,कोनाडे , चिमुकले घाट आणि एक सौम्य,संथ,साधेसुधे खरेखुरे
सहजीवन, कधीच हाताशी न लागलेले.
भीमा नदीच्या प्रचंड जलसाठ्याखाली वर्षातले
अनेक महिने बुडूनही , उजनी धरणाच्या कडेला तगून राहिलेले मंदिराचे
भग्न अवशेष , काही शिल्लक पायऱ्या, जोते आणि एखादी महिरपी चौकट,
बाकी सारे काळार्पण. हे दृश्य पण काही महिन्यात
जलार्पण..
ताजमहालाच्या पटांगणातून यमुना नदीचा अफाट
विस्तार दिसतो. तिथेच या भव्य कबरीच्या छायेमध्ये टिकून राहिलेले एक किनाऱ्यावरचे
हनुमान मंदिर, त्याला लागून बांधीव घाट, बाजूला पिंपळ आणि आवारात भाविकांची गर्दी, जणू यमुनेच्या दैवी प्रवाहाची युगायुगांची
ग्वाही. इतके आश्वस्त केले ह्या दृश्याने !
त्रिपुरी पौर्णिमेला बाजूच्या शिवालयाचा परिसर
दिवे-पणत्यांनी झगमगलेला असताना,
ह्या प्रवाहाजवळच्या घाट-पायऱ्या, त्यातल्या एका कोंदणात लुकलूकणारा एकांडा दिवा, काठावरच्या वडाच्या पारंब्या खाली झेपावणाऱ्या , आणि भारलेल्या अंधारात खळखळणारा
भीमरथी प्रवाह.
महाराणी पद्मिनीचे जौहर स्थळ अशी पाटी, पण तिथे तर आहे एक चौकोनी तलाव,
गहिऱ्या हिरव्या पाण्याने भरलेला, त्या आर्त आठवणी , ते अग्नीचे हुंकार, ते निशब्द अश्रू , तो सामूहिक निर्धार , काय काय सहन केले आपल्या पूर्वजांनी.. त्या क्लान्त गहिवराचे हे जलरूप आहे का?
समुद्राचे दर्शन मला कायमच रौद्रसुंदर आणि गंभीर वाटत आले आहे. त्यातही पूर्व समुद्र तर सकाळचे सूर्य स्नान झाल्यावर उरलेला दिवस आणि रात्र एका वेगळ्याच सुप्त खिन्न भावनेनी वेढलेला वाटतो. त्या उसळत्या लाटा , संध्याकाळचे विरक्त आकाश आणि रिक्त क्षितिज रेषा, सगळे मनाचे खेळ नक्कीच..


Comments
Post a Comment