दृश्य-अदृश्य
आयुष्याच्या प्रवासात काही क्षण मनात कायमचे घर करतात. एखादा आसमंताचा तुकडा , एकांडे अनवट शिल्प , झाडे , पाने , पाणी यांची मूक गाणी किंवा आभाळाचे , धरतीशी जुळलेले गुपित. कुठल्यातरी खोल कप्प्याला स्पर्श करून जाणारी ही चित्रे , दृश्य-अदृश्याच्या सीमारेषेवर रेंगाळणारी , पार्थीव आणि अपार्थिव , एकाच वेळी ! ऋषिकेशला गंगेच्या धावत्या प्रवाहामध्ये तितक्याच हिरीरिने झोकून देणारी पणती.. जणू काही जळामधून ज्योत उगवावी तशी , द्रोण , फुले सगळे समर्पण करून झाल्यावरही गंगाजलाची साथ न सोडणारी , हिमतीची.. प्रयागराजला गंगेच्या किनाऱ्यावरून १५-२० किलोमीटर पासून पायी चालत निघालेले लहान-थोर , बायका , पुरुष , गाठोडी , पिशव्या सांभाळत , भाजत्या उन्हात , कहर गर्दी मध्ये पण त्या अमृतजल संगमस्नानासाठी पायपीट करत जाणारे. कुठली दुर्दम्य श्रद्धा खेचून आणत असेल ह्या वरकरणी साध्यासुध्या पण व्रतनिष्ठ भारतीय समाजाला , आपल्या घरातून , कुटुंबासह , आनंदाने आणि कर्तव्यबुद्धीने या पंचमहाभूत दर्शनासाठी ? जोतिबाच्या देवस्थानाबाहेर एका चौथऱ्य...