आठवणी -२
या रंगांच्या आठवणी , डोळ्यासमोर सहज तरळणाऱ्या, देशोदेशीच्या , गावागावांच्या
लालभडक फुलांचा भरगच्च गालिचा वाटावा असा ट्युलिपच्या फुलांचा नजारा. सपाट लांबवर पसरलेली, फक्त एप्रिल महिन्यात भेटीला येणारी, रंगीबिरंगी शेतं नेदर्लंडच्या, समुद्र हटवून केलेल्या भूमीवरची. कुकेनहॉफ तर फार प्रसिद्ध ट्युलिपच्या बागांसाठी. पण हे दृश्य मात्र रस्त्याकडेच्या ट्युलिप शेतीचे, झील्क नावाच्या छोट्याशा गावातले.
वसंत ऋतू मध्ये ट्युलिपच काय पण इतर अनेक झाडे पण देखण्या बहराने झळाळून निघतात. तसाच हा लाल-गुलाबी, गुलबक्षी फुलांचा मोहोर अमेरिकेच्या टेक्सास मधला.
नारिंगी केशरी छटांनी आसमंत रंगवून टाकणारा अमेरिकेतील प्रसिद्ध हेमंत ऋतू! क्लीव्हलंडच्या परिसरातली अशीच एक संथ हेमंती दुपार,केशरी, पिवळे, लाल रंगांचे फटकारे, निळ्या आकाशाची पार्श्वभूमी आणि त्याच रंगांचे पाणीही
अमेरीकेइतका नाही पण तितकाच लोभस कॉटस्वल्डचा हिवाळ्याच्या उंबरठ्यावरचा, भरजरी नारंगी-बदामी पानगळीचा आणि डेरेदार वृक्षांच्या सावलीत रेंगाळणारा निसर्ग
फ्रांस मधल्या बर्गंडी प्रदेशातून प्रवास करताना अचानक दिसलेली ही सूर्यफुलांची पिवळी शेती. वरती निळ्या आकाशातला सूर्य आणि खाली सूर्य-सोनेरी रंगाच्या पाकळ्यांची सूर्याभिमुख असंख्य फुले !
उत्तर फ्रांस मधल्या डोंगर जंगलातून अशीच सामोरी येतात हि मुलायम जर्द पिवळी , हळदुली चमकती रॅपसीड ची अनेक शेते. कधी मागे हिरवे डोंगर, कधी मध्ये पवनचक्क्या. इतका मोहक रंग आणि इतकी नाजूक फुले..
हिरव्या रंगाचा असा हरित-सुवर्णी पसारा बघितला तो स्मोकी पर्वतरांगांमधल्या एका कपारी मध्ये. दुरून येणार एक ओढा , त्याचे पाणी पण हिरवे, बाजूला दगड गोटे, कंकर यांची गर्दी त्यावरही हिरव्या जीवनाची दुलई चढलेली, वर वर जाणाऱ्या असंख्य फांद्या आणि खोडे आणि डौलदार पाने , आणि त्यातून झिरपणारा सौम्य नितळ सोनेरी प्रकाश, हिरवाई वर पखरलेला. झर्रकन निघून जाणारा चलचित्राचा एक कॅमेरा बंद झालेला क्षण !
स्वित्झर्लंडच्या लुसर्न तलावाची निळाई इतकी तरल की, मागचे डोंगर, आकाश आणि पाणी सगळे त्या अस्मानी रंगात रंगलेले. तलावाच्या विस्तीर्ण पटावर ह्या निळ्या निळ्या हलक्या लाटा आणि उन्हाशी चाललेली दंगामस्ती. हा नीलमण्यांचा खजिना जणू कुणी उघडला आहे आपल्यासाठी.
पण खरी निळ्याची निळाई बघायची तर इटली मध्ये अमाल्फी च्या समुद्रकिनारी. उंच राकट काळेकभिन्न कडे , एकदम समुद्रात घुसणारे.. आणि त्यांना रोखणाऱ्या भूमध्य सागराच्या असंख्य निळ्या निळ्या उफ़ाळत्या लाटा.. इतके नाट्यमय निसर्गचित्र , अनिमिष बघत राहतो आपण
पण कधी तरी ह्या बाल्टिक समुद्राच्या स्टोकहोम पर्यंत घुसलेल्या पाण्याचा रंग तरंगते बर्फाच्या फरशा आणि विहरणाऱ्या शुभ्र धवल हंसांच्या क्रीडा यामुळे चमकत्या उन्हात चक्क आनंदी पारवा दिसू लागतो
जांभळा रंग म्हणजे लव्हेंडर नाही आठवले तर नवल. दक्षिण फ्रान्स मध्ये मैलोन्मैल पसरलेले केवळ जुलै मध्ये उन्हाळयात येणारे लव्हेंडरचे निळे जांभळे सुगंधी शेत. इतके नाजूक फूल आणि इतका धुंद करणारा सुवास..
आणि ही आपली भूमी,सगळ्या रंगांना सामावून घेणारी.. मॉरिशस मधली सप्तरंगी पृथ्वी.. एकाच डोंगर उतारावर अनेक रंगांचा अविष्कार
Comments
Post a Comment