आठवणी -१


 मुलायम पीतरेशमी फुलांची कुरणे , पसरलेले हिरवे गालिचे आणि आर्देन्सच्या रानातले सोनेरी कवडसे

परिसराला कवेत घेणारी म्यूस, तिच्या निळ्या पाण्याचे, बाजूच्या कडे-टेकड्यांना पडलेले लयदार वळसे

दिनांतच्या रंगीत किनाऱ्यावर, तर कधी बलदंड किल्यांच्या माथ्यावरून , डोळेभरून बघितले, म्यूसचे असे वाहते राहणे ||



कधी अचानक दिसते, डोळ्यासमोर फुललेली वासंतिक पायवाट, ऱ्हाईनच्या कडेने पाण्याला सोबत करताना
तर कधी आठवतात उंच गिरिजाघरे, क्षितिजावर, जलपटाच्या पलीकडे ढगाळ आकाशात झेपावताना ||





पॉन्ट दु गार्डचा भव्य नजारा, दोन्ही तीरांना सांधून उभा, त्यावर चालणारी पावले अविरत
संथ जणू काही स्तब्ध , गार्दोचे हिरवे काळे पाणी पाषाणबद्ध, पाण्याची पुलाला, शतकांची मूक सोबत ||




आणि दिसतात मग त्या झगमगत्या, श्रीमंती प्रासादांनी वेढलेल्या, थेम्स आणि सीन....
गढूळ, थांग न लागणाऱ्या पाण्याने, तीरावरचे असंख्य चेहरे झेलणाऱ्या, क्षणोक्षणी कणाकणाने थकणाऱ्या

पावसाळी काळोखात करड्या सिमेंटी रंगाच्या आणि प्रसन्न वसंतात,उजळणाऱ्या प्रकाशाने हसणाऱ्या, शहरी नद्या ||







पुन्हा वाटते जावे त्या सोर्गच्या शीतल प्रवाहापाशी ,उंच डोंगराच्या सावलीत, वेली झाडांच्या पसरलेल्या मांडवात
ओंजळीत घ्यावे तिचे पाचूच्या चुऱ्याचे पाणी, आणि पुन्हा ऐकावी ती गोष्टींची गाणी, पुन्हा एका शांत दुपारी ||



आणि राहून राहून आठवते, गजबजलेल्या नव्या पुराण्या जगातून, खोल खोल वाहणारी, एक अलिप्त नदी..
ऐकावी म्हणते टायबर ची कहाणी, ना दिवा, ना घाट ना काठावरचा उत्सवी साज,
हिरव्या गूढ पाण्याची, जणू रोमची उदास विराणी !

Comments

Popular Posts