गिरी शिखरी, कुंजवनी

 सरत्या जून महिन्याच्या कडक उन्हाळ्यात  दक्षिण फ्रान्सची भूमी अधिकच तापलेली असते.


प्रोव्हान्स म्हणजे फ्रान्स चा दक्षिणपूर्व भाग, भूमध्य सागराची संगत आणि बरोबरच शुभ्र चुनखडीच्या छोट्यामोठ्या टेकड्या-डोंगरांची गर्दी ! 



मीठागरे, रोझे नामक वाईन, लॅवेंडरची जांभळी, सुगंधी सजावट, ऑलिवच्या सळसळत्या पानांनी गुंजणार्‍या बागा यांनी या भूमीला एक वेगळेच सौन्दर्य बहाल केले आहे. प्रोवान्स- च्या ईशान्येला लुबेरोन नावाची पर्वत राजी आहे. 
चुनखडी आणि वालुकाश्माच्या लहान उंच टेकड्या, त्याभोवती विणलेली छोटी छोटी सुंदर खेडी, अधून मधून उंच सायपृस ची झाडे, रस्त्याचा बाजूला नेपोलिअननी लावलेली सिकमोर ची वृक्ष संपदा , दूर वर पसरलेली द्राक्षशेती, या सगळ्यांनी हा परिसर पर्यटकांना खुणावतो आहे. ह्या टेकड्यामध्ये छोटी छोटी नेटकी आणि देखणी गावे वसली आहेत.

लोर्मींन -

हे असच एक छोटेसे, जेमतेम २००० वस्तीचे गाव. गावाबाहेर गढी वजा एक महाल, त्याभोवती मोकळे रान. तिथून चालत गावाकडे निघालो कि एका बाजूला एक प्रोटेस्टन्ट चर्च , बसायला काही बाकडी आणि निवांत शांतता ..

थोडे पुढे गेले एक एक तीन चेहऱ्याचा भित्तीशिल्प, त्यातून बाहेर पडणारी जलधारा, जरा मोकळा चौक आणि पुढे रस्ता. 

लोर्मींन हे लुबेरॉन पर्वतमानधली मोकळ्या खोऱ्या मध्ये वसले आहे, अकराव्या शतकापासून ह्या मार्से ते apt ला जाणाऱ्या रस्त्याबरचे एक महत्वाचे ठाणे मानले जाते. अल्बर्ट कामू हा प्रसिद्ध फ्रेंच लेखक ह्या गावाचा रहिवाशी होता. या गावात यावे, एखाद्या कॅफे मध्ये शांत बसावे, गोलाकार जाणाऱ्या रस्त्यानी फिरून येऊन पुन्हा मोकळ्या माळावरची ताजी हवा अनुभवावी , गढीमधल्या देखण्या बागेला भेट द्यावी आणि पुढे चालू लागावे !

रुसियों - 
हे व्होकलूस परागण्यातले आणि लुबेरॉन पर्वतरांगांमधले अजून एक रसिकरोमांचक ठिकाण आहे. आपल्या कोकणातल्या लाल मातीशी स्पर्धा करेल असे काही मोजके डोंगर ह्या गावाच्या उशा -पायथ्याशी उभे आहेत. 

लाल माती चा रंग लाल पेक्षा ही जर्द पिवळा, आंबे हळदी सारखा, तर कुठे केशरी अष्टगंध सारखा. ह्या गेरू मातीचे डोंगर, त्याने मळलेल्या पायवाटा, आणि बाजूला पोपटी हिरवी उन्हाळी झाडी , वरती खुले निळे आकाश. 

प्रवाशांची तुडुंब गर्दी असलेल्या ह्या अनोख्या रंगीत गावामध्ये आठवडी बाजार भरला होता, खाण्या पिण्या बरोबरच डोंगर टेकड्यांचा रंग बाटल्यात भरून नेण्यासाठी तयार होता. 



गावातली घरे पण अशीच लाल-केशरी-गुलाबी-पिवळ्या-भगव्या दगड-रंगानी माखलेली. 'वेटिंग फॉर गोदो ' ह्या प्रसिद्ध नाटकाचा लेखक, सॅम्युअल बेकेट हा रुसियों चा काही काळ रहिवासी होता.

गोर्दे - 
हे एक लुबेरॉन मधले अजून एक वेगळेच गाव. डोंगर माथ्यावर वसलेल्या ह्या गावात सर्व घरे  दगडांचीच असली पाहिजेत असा दंडक आहे.




 रोमन काळापासून वस्ती असलेल्या ह्या छोट्या गावात, एक बलदंड किल्ला उभा आहे. अंगणाला दगडांच्या भिंती , घरे पण दगडांचीच असल्याने इथली चुनखडीच्या विविध छटा पावसा-उन्हाने रापलेल्या बघायला मिळतात. इथे जवळपास, दगडी फरशांनी बांधलेली कुटीरे सापडतात. दोनशे वर्षांपूर्वी त्यांचा राहण्यासाठी उपयोग होत असे. 

पायथ्यापासून बघितले तर गोर्दे  गावाची व्याप्ती डोंगराच्या अंगाखांद्यावर पसरली आहे.

ऍबे नोत्र दाम दे सिनौक -

लुबेरॉन डोंगरमधल्या एका रुंद खोर्यामध्ये , या मठाची स्थापना बाराव्या शतकात झाली. छोट्या कुटीर-झोपड्यापासून मठाची वाटचाल आत्ता  दिसणाऱ्या पांढऱ्या शुभ्र  देखण्या इमारतीपर्यंतची झाली आहे

या मठातील साधक, हे समोरच्या मोकळ्या जमिनीवर उन्हाळ्यामध्ये  लव्हेंडर ची बाग फुलवतात आणि  मधमाशा पाळून आपली उपजीविका करतात. जून आणि जुलै च्या महिन्यात ह्या ऍबे चा परिसर लव्हेंडर च्या निळ्या जांभळ्या फुलानीच्या बहरलेला आणि त्याच्या मंद सुगंधाने दरवळलेला असतो. 

जरा अंतरावर उभे चुनखडीचे उंच पांढरे कडे , त्यावरची तुरळक हिरवी वनराजी आणि जमिनीवर अंथरलेला सुगंधी गालिचा , मधूनच पिवळ्या -लाल रानफुलांची वेलबुट्टी आणि नेहमीचे पाईन आणि सायप्रस सोबतीला कडेकडेने असा सगळा मनोरम निसर्ग , उन्हाळी सोनेरी उन्हाने न्हाऊन निघालेला असतो.


फोंतान द व्हकलू -

हे चिमुकले अती सुंदर गाव म्हणजे सोर्ग नदीच्या उगमाचा झरा. एका दंतकथेचा पदर लाभलेले हे गाव,

त्यातील उगमापर्यंत जाणारा रस्ता , शेजारी उंच उंच चढणारे लुबेरों चे डोंगरआणि शेजारून वाहणारी तेजस्वी हिरव्या जलद वेगाने वाहणाऱ्या पाण्याची  सोर्ग  नदी , त्यात वसतीला असलेली बदके , पाण्याशी लडिवाळ खेळणाऱ्या वेली आणि दुतर्फा असणारी शांत झाडी. 

दक्षिण फ्रान्स च्या कडक उन्हाने हैराण झाल्यावर ह्या पाण्याचा स्पर्श कमालीचा सुखद वाटतो आणि जीव ताजातवाना होतो !

इथे पण सुबक कॅफे , खाऊ ची दुकाने , त्यात तिथल्या जॅम , जेली आणि इतर नवलाई च्या वस्तूंची गर्दी, आणि निवांत फिरणारे पर्यटक. गावाच्या सुरुवातीला एक मोठा चौक, नदीवरचा पूल आणि उंच डेरेदार झाडांची सावली आणि जरा पलीकडे एक दगडी चर्च, अशा निवांत जागी, मन शांतावते हे खरंच.. 




शॅटूनाफ दु पाप -
म्हणजे 'वडिलांचा नवा किल्ला' ही फ्रान्स मधल्या, ऱ्होन नदीच्या  खोऱ्यातल्या प्रसिद्ध लाल वारुणीची सिद्धभूमी आहे. चौदाव्या शतकात वसलेल्या या गावाभोवती अनेक हेक्टर द्राक्षांचे मळे आहेत. वाईन बनवण्याचा प्रचंड मोठा व्यवसाय इथून चालवला जातो. मुळात पोप आणि त्यांच्या सहकार्यासाठी वाईन मुरवण्यापासून या गावाची सुरुवात झाली. 

एकोणिसाव्या शतकात बांधलेली एक रुबाबदार गढी  आजूबाजूच्या द्राक्षवेली-मळे यांच्यावर नजर ठेवून असते.  द्राक्षे  सोलणे, फोलपटे काढणे, त्यातून रस गाळून घेणे , मग त्यात इतर गोष्टी मिसळून, प्रचंड मोठ्या लाकडी पिंपामध्ये अंधाऱ्या आणि बंद जागेमध्ये ही वारुणी मुरवली जाते. जितकी जास्त जुनी तितकी अधिक रसभरी असा साधारण संकेत आहे.

अशी ही गिरी शिखरी, कुंजवनी यात्रा सुफळ संपूर्ण !


Comments

Popular Posts