देऊळ-वाटा

नागेश्वर मंदिर

नागझरीच्या पलीकडे, आणि आता दाटीवाटीने उभ्या असलेल्या इमारतींच्या मध्ये पुणे शहराचा सातशे वर्ष जुना ठेवा, नागेश्वर मंदिराच्या रूपाने अजून ही टिकून आहे. मोडकळीस आलेल्या ह्या मंदिराचा नव्याने जीर्णोद्धार झाला असून, आता ते सुस्थितीमध्ये आहे. मंदिराच्या आवारामध्ये सुबकसा नंदी आणि शनिदेवाची मूर्ती पण आहे. लाकडी नेटका  सभामंडप आणि भव्य शिखर मंदिराच्या वास्तूला एक देखणे परिमाण देतात.




त्रिशुंडया गणपती मंदिर

नावाप्रमाणेच तीन तोंडे, सहा हात आणि मोराचे वाहन असणाऱ्या गणपतीचे हे वैशिष्ट्यपूर्ण मंदिर सोमवार पेठेमध्ये अठराव्या शतकामध्ये बांधले गेले. काहीसे गूढ भासणारे हे मंदिर त्यावरील शिल्पवैभवासाठी प्रसिद्ध आहे..काळ्या
पाषाणामधील द्वारशाखा , द्वारपाल आणि भिंतीवरील देवकोष्ठके यांनी हे मंदिर सुरेख सजले आहे.


तुळशीबाग राम मंदिर

बांगड्याभांड्याच्या किणकिणाटामध्ये, सदैव गजबजलेले तुळशीबागेतले हे रामाचे भव्य मंदिर !  सुरेख  लाकडी,अनेक खांबी सभा मंडप, छतावरचे वेलबुट्टीदार नक्षीकाम, बाजूचे  रंगीत सुघड शिखरांचे लहानसे  मंदिर, उंचच उंच निळ्याआकाशामध्ये गेलेले मंदिराचे मुख्य  शिखर आणि प्रांगणामधली विलक्षण सुवासिक कनकचंपेची पखरण. ह्या मंदिराने  अशी अनेक हृद्य स्मृतिचित्रे आपल्या आयुष्याला बहाल केली आहेत.



कामेश्वर

नेनेघाटावरचे, खाजागी मालकीचे हे छोटेसे देऊळ, त्याच्या शिखराच्या नागर शैलीसाठी पुन्हा पुन्हा बघावे असे आहे.


अमृतेश्वर-सिद्धेश्वर 

अमृतेश्वर-सिद्धेश्वर अशी ही देऊळ जोडी नदीच्या अगदी निकट आहे. सुघड  बांधणीचे अमृतेश्वर, आवारामधला सतीचा चौथरा, सिद्धेश्वराचे छोटेखानी मंदिर आणि पूर्वेच्या उगवत्या सूर्याचे किरण पडून झळाळणारे अमृतेश्वराचे मराठा-पेशवा धाटणीचे सुंदर शिखर... 


ओंकारेश्वर 

मुठा नदीच्या काठावराचे हे पेशवेकालीन , दणकट दगडी बांधणीचे , वेगळ्या धाटणीच्या नऊ शिखरांचे ओंकारेश्वर शिवालय. पावसाळ्यामध्ये कधी कधी मंदिरामधून मुठेचा  दुथडी वाहणारा प्रवाह बघताना, तर कधी सोनेरी उन्हात आवारातल्या पिंपळाची सळसळ ऐकताना, तर कधी शिवरात्रीसाठी झेंडूच्या माळांनी उठून दिसणाऱ्या मंदिराच्या दगडी भिंतीवर हात फिरवताना, एक जागता वारसा अनुभवतो आहोत याची जाणीव होत राहते.


पाताळेश्वर

पुण्यातले सर्वात पुरातन मंदिर, नवव्या शतकामध्ये  खोदलेल्या दगडी लेण्या, त्यांची तीन प्रवेशद्वारे, गोलाकार नंदी मंडप, भिंतीवरील  शिलालेखआणि देवचाफ्याची बहरलेली पुष्पसावली..  जवळच्या जंगली महाराज समाधीचा धीरगंभीर अंतर्नाद जाणवेल इतकी पाताळेश्वराची शांतता विलक्षण आहे. पण कधी तरी त्रिपुरीपौर्णिमेच्या रात्री, दिव्या-पणत्यांनी  उजळेलेले हे प्राचीन स्थान तेव्हाही तितकेच मनाच्या गाभाऱ्यामध्ये घर करते.



Comments

Popular Posts