कोणे एके काळी, एकशिला नगरी..



उत्तर तेलंगणाची 
हिरवी भूमी. ही भातशेतेझुलणारे ताड माडऋतुमानाने उमलणारी फुलांची रंगबहार आणि आकाश सामावलेली असंख्य छोटी मोठी तळी अशा साऱ्या निसर्गाने समृद्ध आहे. 


निसर्गाप्रमाणेच अनेक पराक्रमी राजवंश सुद्धा ह्या भूमीच्या आधाराने फळले आणि फुलले . अकराव्या शतकात उदयाला आलेल्या काकतीय राजघराण्याने दैदिप्यमान इतिहास तर रचलाच पण त्याबरोबरच ह्या जमिनीवर अत्युत्कृष्ट शिल्पकलेचे एकाहून एक दिमाखदार नमुने पण उभारले.


हैद्राबादच्या ईशान्येस काकतीयांची राजधानी वरंगळ आजही त्या इतिहासाला उराशी जपून आहे.
वॊरुगल्लू , म्हणजे 'मोठा पाषाण' हे वरंगळ चे मूळ नाव, काकतीय काळात प्रचलित असलेल्या 'एकशिला नगरी' या प्राचीन नावाशी मिळतेजुळते आहे.

ह्या शहर-गावाच्या हृदयाशी आहे तो एका धाकट्या टेकडीवर उभा वरंगळचा किल्ला.
एकात एक अशी गोलाकार तटबंदी असलेल्या ह्या किल्ल्याची उभारणी राणी रुद्रम्मादेवी, गणपतिदेव आणि प्रतापरुद्र  या काकतीय शासकांच्या कारकिर्दीमध्ये झाली


किल्याच्या मध्यभागी विस्तीर्ण प्राकारामध्येगणपतिदेव राजाच्या कारकिर्दीत तेराव्या शतकामध्ये  बांधलेले आणि मलिक काफूर ने खिलजीच्या आदेशानुसार उध्वस्त केलेले महाभव्य स्वयंभू शिव मंदिराचे विखुरलेले अवशेष आपल्याला विस्मयचकित करतात. 



प्रचंड मोठ्या दक्खनी पाषाणाच्या शीळात्यावरचे अद्भुत कोरीवकाम छत उडालेले उत्तुंग खांबद्वारशाखाकीर्तिमुखपूर्णाकृती शिल्पे.. असा सारा अवाढव्य पसारा.. 



भारतीय पुरातत्वखात्याने कष्टाने हे भग्न आणि काही टिकलेले अवशेष जोडून त्यातून मंदिराची थोडीफार उभारणी करण्याचा प्रयत्न केला आहे. 


खांबांच्या उंचीवरून देवालयाच्या भव्यते विषयी अंदाज करता येतो. द्राविड शैलीच्या बांधणीची अनेक लहान मोठी मंदिरे सामावून घेणारा हा मंदिर समूह असावा. 
पुढील काळातील इस्लामी आक्रमकांनी ह्या खांबांचा वापर करून मशिदीचे रूप देण्याचा प्रयत्न केल्याचा उल्लेख सापडतो. 


तेलंगण राज्याचे चिन्ह असे वरंगळ तोरण, म्हणजे बाह्य प्राकाराचे प्रवेशद्वार. अशी तेहेतीस फुटी उंचीची ४ तोरणद्वारे चार दिशांना आहेत आणि त्यामुळे ह्या मंदिराच्या भव्यतेची जराशी कल्पना येऊ शकते.


कधीकाळी निळ्या आभाळात घुसलेले कळसावरचे आमलक आणि मंत्रोच्चाराने  दुमदुमल्या गाभाऱ्याचे कलात्मक कोरीवकामाने नटलेले शिखर अचानक जेव्हा पायतळी येते.. 


ह्या विस्तीर्ण परिसरामध्ये जागोजागो दिसते ते इथे तिथे विखुरलेले शिल्पवैभव



कुठे कोसळलेले कोरीव आणि बलदंड खांब, कुठे  द्वारशाखेचे फुलापानांनी मढलेले पाषाणपट्ट , कुठे जोत्याचे भक्कम दगड आणि त्यावरची कारागिरी !

कुठे पाण्यात  उतरणाऱ्या डौलदार रेखांकित पायऱ्या  आणि कुठे सहस्रो पाकळ्यांचे कमलपुष्प, पाषाणाला सजीव करणारे. सारा परिसरच भारलेला,  जणू काही एखादी  प्राचीन स्वप्ननगरी.. शापित आणि कालशरण ..

हणमकोंडा हे वारंगळचे जोडशहर. बलाढ्य काकतीय राजांची ही मूळ राजधानी. 

इथले  रुद्रेश्वरस्वामी  देवालय हे शंकर, विष्णू आणि सूर्य ह्या तीनही देवतांचे त्रिकूट पद्धतीचे अती भव्य मंदिर आहे. 



रुद्रदेव काकतीय राजाने बाराव्या शतकात बांधलेल्या ह्या मंदिराच्या अनेक खांबी सभामंडपा मुळे हे मंदिर हजारखांबी  म्हणूनही प्रसिद्ध आहे.






ठेंगण्या टेकड्यांमध्ये ,संध्यारंगी रंगणाऱ्या जलाशयाच्या काठावरचे  हे भद्रकाली देवीचे स्थान पुरातन आणि आजही गजबजलेले ! 

 एका शिलालेखानुसार ईस ६२५ मध्ये चालुक्य राजा पुलकेशीने वोरुगल्लूच्या ह्या भद्रकाली मंदिराची  स्थापना केली. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा ह्या देवीमूर्तीच्या डोळ्यात बसवलेला होता. 

असे हे काकतीयांच्या कुलदेवतेचे प्रांगण, दैवी अस्तित्वाने भारलेले, मनाला आश्वस्त करणारे. 



 पाषाण शिल्पे, भव्य देवालये याबरोबरच देवतेच्या विग्रहावर हिरेमाणकांच्या सजावटीचे उल्लेख आणि काकतीय राजा-प्रजेची सश्रद्ध सामाजिकता...  
हणमकोंडा- वरंगळ  ह्या जोडगावांची प्राचीन ओळख अशी फार वैभवशाली आहे.








Comments

Popular Posts