नाशिक - ह्या गोदावरीतीरी

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग 
 

गोदावरीचे उगमस्थळ आणि श्री महादेवाचे अस्तित्व या दोन्हीचा पावन संगम म्हणजे त्र्यंबकेश्वर! त्र्यंबक म्हणजे तीन डोळ्यांचा, इथे शिवलिंगाऐवजी एक खळगा व त्यात ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे प्रतीक असे तीन उंचवटे दिसतात.  गौतम ऋषींच्या उपासनेमुळे इथे साक्षात गंगेचे गोदावरी रूपाने अवतरण झाले, म्हणून गोदावरीला गौतमी गंगा असे सुद्धा म्हणले जाते. त्र्यंबकेश्वराच्या काळ्या दगडातल्या पेशवेकालीन मंदिरामागे उभा ब्रह्मगिरीच्या खडा कडा आणि पलीकडे गोदावरीचे प्राचीन कुंड, कुशावर्त !  त्र्यंबकेश्वर हे बारा प्रमुख ज्योतिर्लिंगांमध्ये  गणले जाते. 

जैन मंदिर, अंजनेरी 

त्र्यंबक पासून नाशिकला जाताना पूर्वेकडे लागतो अंजनेरी पर्वत, परंपरेप्रमाणे हनुमानाचे जन्मस्थान. त्याच्या पायथ्याशी  उभी आहेत काही मंदिरे, एकाकी, भग्न आणि तरीही तेजस्वी.. ह्या जैन मंदिरांचा समूह बाराव्या शतकापासून  वारा, पाऊस, उन्ह यांचा कहर सहन करत अजूनही उभा आहे.. 


पण मोडकळीला आलेले कळस, विखुरलेले शिल्पवैभव आपल्याला खंतावून जाते नक्कीच !

गोदा काठ 

खरे नाशिककर आपल्या गावाला नासिक म्हणतात. ह्या नाशिकमध्ये प्रभू श्रीरामांचे वनवासात असताना वास्तव्य होते ती जागा आज पंचवटी या नावाने ओळखली जाते. नासिकच्या मध्यावर, गोदावरीच्या तीरी  अनेक मंदिरांची दाटीवाटी आहे.  अनेक शिवमंदिरे, देवळ्या, पूजासाहित्याची छोटी दुकाने, नदीकाठाचे दगडी घाट त्यावर साधू, बैरागी, भाविक यांची गर्दी .. 

या सगळ्यातून ही एका मंदिराचे देखणे शिखर नजरेत भरते. 

नारोशंकर मंदिर

नारोशंकर मंदिराच्या  शिल्पांकित भिंती, सभामंडपावरचे अनेक सिंहमूर्तीनी  मंडित  शिखर आणि परिसरावर उतरलेली कातरवेळ, एक गूढ स्मृतिचित्र  मनावर उमटवून जाते.


काळा राम मंदिर

घाटावरून, एका चढावरच्या पुरातन बोळातून एक रस्ता काळा राम मंदिराकडे जातो. ह्या मंदिराची शैली पेशवेकालीन आहे. भव्य मंदिर आणि त्याचा विस्तीर्ण ,स्वच्छ परिसर मन प्रसन्न करतो. राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती काळ्या दगडातील आहे म्हणून हा काळा राम ! 

गोंदेश्वर मंदिर

नाशिकजवळच्या सिन्नरला मंदिरवैभवाचा फार मोठा वारसा लाभला आहे. गवळी राजा ( काहींच्या मते यादव राजा) गोविंद याने ११-१२व्या शतकात बांधलेले गोविंदेश्वर - गोंदेश्वर मंदिर हा खरोखरीच भारतीय मंदिर स्थापत्याचा भव्य आणि गौरवशाली अविष्कार आहे. पंचायतन पद्धतीने बांधलेल्या मंदिरातील प्रमुख देवता शिव आहे. 


दूरवरच्या पर्वतराजीच्या पार्श्वभूमीवर  ह्या भूमिज स्थापत्य शैलीच्या मंदिराचे कोरीव कळस निळ्या आकाशाशी सहज बोलू बघतात. 


ऐश्वर्येश्वर मंदिर 

सिन्नरचा उल्लेख अकराव्या शतकातील एका दानपटामध्ये सापडतो. तेथील ऐश्वर्येश्वर मंदिर तितकेच देखणे. जरा लहानखुरे आणि मंदिराच्या कळसाची पडझड झालेले.. 

पण सुरेख कोरलेले खांब, गर्भ गृहावरचे मकर तोरण , आणि जवळच्या डेरेदार वृक्षाची शांत सावली.. हे देऊळ मनात घर करते. 


पांडव लेणी 

नाशिकच्या जवळ एका डोंगरावर दोन हजार वर्षांचा सांस्कृतिक ठेवा आहे.  पांडवलेणी नावाने ओळखल्या  जाणाऱ्या २३ लेण्या , चैत्य, विहार, कोरीव सज्जे , लेण्यांच्या भिंती , अनेक बौद्ध चिन्हांचे सुशोभन, जवळ पाण्याचे टाके आणि देवचाफ्याचा बहर सोबतीला.. 


हीनयान आणि महायान ह्या दोन्ही कालखंडांशी निगडित असणारी ही लेणी त्रीरश्मी  पर्वतावर आहेत असा उल्लेख सापडतो. 


नासिकच्या संपन्न इतिहासाच्या पदचिन्हांची ही यात्रा इथे सुफळ संपूर्ण !

Comments

Popular Posts