यात्रिक


भेडाघाट इथला नर्मदेच्या प्रवाहातला खडक, संगमरवरी कांतीचा आणि निळ्या शीतल पाण्याच्या लाटांमध्ये डुंबणारा. त्यावर कुणा  महाभागाने एक शिवलिंग ठेवले, एक ध्वज रोवला. श्रद्धेचा प्रवास हा परिश्रमाने  घडवलेल्या भव्य दिव्य मंदिरापासून, ते नदी-तळी, खडक-डोंगर यांच्यापर्यंत सहजी पोचतो. नर्मदेच्या स्पर्शाने पावन झालेल्या दगडालाही देवघरात जागा मिळते. आजू बाजूच्या साऱ्या पसाऱ्यामध्ये परमेश्वर दिसणे ही माणुसकी आहे आणि ते परमेश्वरत्व जाणणे ही अध्यात्मिक अनुभूती आहे.


लडाखमधील खारदुन्गलाच्या  उत्तुंग उंचीवर बर्फाळ वाऱ्याच्या झोतात लहरणाऱ्या ह्या प्रासादिक पताका ! शुभचिंतक आणि शुभचिन्हांकित... 
त्यांच्या प्रत्येक झोक्यातून उमटणारा अनाहत मंत्रजप, मार्गस्थांचीं पाठराखण करणारा..  


महाबलीपुरम च्या जवळची व्याल-गुंफा - व्याल म्हणजे तीन चार प्राणिविशेष एकत्र करून तयार झालेला  काल्पनिक प्राणी ! 
गुहेच्या दाराभोवती कोरलेले वाघाचे किंवा व्यालाचे उग्र चेहरे लांबून फुलांची महिरप असावी असे दिसतात. आत जायला पायऱ्या आहेत पण सभोवार गढूळलेले पाणी आहे. पूर्वी नसावी  पण २००३ च्या सुनामी नंतर ही गुंफा अशी जाण्यास दुस्तर झाली आहे. 


धरणाच्या पाण्यात बुडालेली पुरातन मंदिरे कायमच मनात घर करतात. त्यांची शिखरे , एखादी कोरीव भिंत पाण्याबाहेर डोकावत असते, तेही किती तरी दूर, भल्या विस्तीर्ण जलपटाच्या मध्य्यात, जणू देवाची जलसमाधी ! कशी असतील ही मंदिरे, कसा असेल त्यांचा जाण्याचा रस्ता, त्यांच्या ओसाड होण्याची कथा कशी उलगडली असेल आणि  वेदना कुणी सोसली असेल.. 
राजस्थान मध्ये उदयपूर जवळ नागदा गावाजवळ हे मंदिरांचे भग्नावशेष पाण्यामध्ये उभे आहेत..  निश्चल. मूक .. अटळ संहाराची वाट बघत 



खरोखरीचा महात्मा.. सुखदुःखापलीकडच्या सत्याचा शोध घेणारा महावीर ! आणि म्हणूनच असा मोकळ्या आभाळाखाली , हिरव्या पाना-फांद्यांच्या सावलीत , पडझडलेल्या आवारात , वैश्विक बदलांचा साक्षीदार तसाच निर्मोही आणि निरंतर .. देवळातला सुरक्षित गाभारा असो किंवा हा वाटेवरचा आडोसा असो, भक्तांचे सोन्यारूपाने चमचमणारे प्रेम असो किंवा ही निष्ठुर निष्क्रियता... त्या महंत योग्याला दोन्ही सारखेच !
नाशिक जवळच्या अंजनेरी च्या जैन मंदिरांजवळ ही वर्धमान महावीराची पूर्णाकृती मूर्ती.. 


महेश्वरला पहाटेच्या हलक्या वाऱ्याच्या झोताने रेशमी पाण्याचा फिका पडदा हलला आणि चालताना अचानक दिसले हे पाण्यामध्ये रुजलेले शिवलिंग. नदीमध्ये आतवर गेलेल्या घाटाच्या पायरीवरती स्थितप्रज्ञ असे ते शिवचिन्ह.. कधी पाणी ओसरले तर कुणी भाविक फुले वाहील, धूप घालेल.. पण जसे ऋतुचक्र फिरेल तसे पुन्हा जाईल पाण्याच्या खाली, कायमच्या जलाभिषेकासाठी!  आपणच रचलेल्या गोष्टी आणि आपणच वाटून घेतलेल्या भावना.. 


उत्तराखंडमध्ये जागेश्वर वरून परत येताना वाटेत दिसलेले एक छोटेसे, ओसाड, शेवाळ पांघरलेले देऊळ. आजूबाजूला अती उंच देवदारांची दाटी ,इतकी की  उन्हा ला सुद्धा अटकाव असावा. जागेश्वर च्या रत्नहारातला एखादा हिरा घरंगळून इथे अडकला असावा असे ते अगदीच इतरांपासून दूर पडलेले ध्यानस्थ मंदिर. काय  माहित पुन्हा त्या रस्त्याने गेले तर कदाचित दिसणार ही नाही !


देऊळ म्हणजे देवाचे घर आणि त्याच्या बाहेर परिसर उजळायला लावलेला दिवा. कुठे कधी उंच कोनाड्यानी सजलेली लखलखती दीपमाळ आवारामध्ये तर कुठे ही जलाशयाच्या मध्यभागी उभी एकाकी दीपदंडी . ओडिशामधल्या हिरापूर च्या योगिनी मंदिराबाहेरचा हे छोटेसे तळे आणि त्यात प्रायश्चित्त घेत उभी राहिलेली, हृदयाशी तो तप्त दिवा जपणारी जणु कोणी शापीत योगिनीच ! 


हिमालयामध्ये दुर्गम डोंगरावर पायपीट करून पोचण्याची हजारो ठिकाणे आहेत. बहुतेकदा एखादी देवी नाहीतर शंकर नाहीतर त्या गावाची इष्ट देवता अशा  ठिकाणी आपली वाट बघत असतात. डलहौसीच्या जवळ, अशीच एक रानातली, उन्ह-सावली विखुरलेल्या वळणांची वाट,वर चढत घेऊन जाते पोहलानी मातेच्या देवळापर्यंत. आणि तिथे निळ्या प्रसन्न आकाशात उंच लहरणारे भगवे केशरी ध्वज आणि काळ्याशार दगडातली उग्रमुद्रा देवी, तुम्हाला एका नवीन ऊर्जेने भारून टाकतात. 


हिमाचल प्रदेशातील रावीच्या किनाऱ्यावरचे चंबा -  तिथले गावाबाहेरच्या  चामुंडा मंदिराबाहेरचे हे पदचिन्ह. 


भूतान मध्ये पुनाखाच्या भाताच्या शेतीमध्ये किंवा कुठेही लांबवर नजरेस पडणारे हे स्मृतीफलक. पूर्वजांच्या आठवणी मनात जपणारे. 


स्वीडन मध्ये स्टॉकहोम च्या बाहेर गाईड ने दाखवलेला हा पुरातन पाषाण , त्यावर  चितारलेले सर्प , भारतीय सर्पशिल्पांची आठवण करून देणारे.. पुराण्या समजुती, भौगोलिक सीमा ओलांडून सांस्कृतिक पूल बांधणाऱ्या.. 


प्रयागराजला यमुनेच्या काठावर किनाऱ्यावरच्या मऊशार वाळूमध्ये  विराजमान हनुमान मूर्ती !  दूरवर गंगा संगम, तिथे भाविकांची झुम्मड उडाली आहे आणि इथे कुणीतरी हार घालून या मूर्तीची पूजाही रचली आहे


हा उगवता सूर्य, ही वाहती गंगा, ही प्रसन्न पहाट, ही थंड वाऱ्याची झुळूक आणि हा मोक्षपुरी वाराणसीचा आसमंत ! पंचमहाभूतांचे हे विराट मंदिर.. केवळ विलक्षण !



Comments

Post a Comment

Popular Posts